!! श्री विंझाई देवी नमः !!
श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी संस्थेच्या संकेत स्थळाला भेट देणाऱ्या श्री विंझाई देवी भक्त,
ज्ञाती बंधू भगिनींचे तसेच हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत!
www.vinzai.org हे आपल्या संस्थेच्या संकेत स्थळ (वेबसाईट) असून त्यात आपल्या देवस्थान व कायस्थ
समाजाची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या कार्यासाठी सर्व सभासद व
हितचिंतक यांजकडून सहकार्याची अपेक्षा आहे. या संकेतस्थळावर पुढील माहिती एकत्रीत करण्याचा प्रयत्न
असून आपणही माहिती पाठवू शकता, काही विषय सुचवू शकता.
१. श्री विंझाई देवीचे आलेले अनुभव
२.श्री विंझाई देवस्थान मंडळातील आपला सहभाग
३.कायस्थांची देवस्थाने ४.ललित साहित्य
५.सी.के. पी. पाककृती
६.सी.के. पी.व्यावसाईक जाहिराती.
७. इतर
८. सी. के. पी. समाजातील विशेष व्यक्तिमत्वांची ओळख
श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी:-
भारतात आदिशक्ती विंध्यवासिनीची आठ मंदिरे आहेत. जागृत कुलस्वामिनी श्री विंझाई मातेचे मंदिर, सह्याद्री पर्वतराजीमध्ये ताम्हिणी घाटाच्या कुशीत निसर्गरम्य ताम्हिणी या चिमुकल्या व शांत गावात आहे. श्री विंझाई माता हे महाराष्ट्रातील इतर साडेतीन शक्तीपिठासारखेच जागृत देवस्थान आहे.
श्री विंझाई देवस्थान मंडळाची स्थापना १८ एप्रिल १९७३ रोजी झाली. मंडळाने शिवमंदिर व भक्त निवास विस्तार योजना या प्रकल्पाचा संकल्प सोडला आहे. प्रकल्पपूर्तीकरीता निधीची आवश्यकता आहे. मंडळाची हि वेब साईट परदेशात व भारतभर विखुरलेल्या भक्तजन व हितचिंतक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रभावी मध्यम आहे.
ताम्हिणी -श्रीदेवीचे वसतीस्थान :
मंडळाचे उदिष्ठ व कार्य :-
मानवसेवा हीच ईश्वर सेवा ( Service to Humanity is Service to God ) हे मंडळाचे ब्रीदवाक्य आहे व त्याप्रमाणे मंडळाचे कार्य गेली चौतीस वर्षे अखंडपणे चालू आहे. देवीचे धार्मिक कार्यक्रम करीत असताना त्या मागील वैज्ञानिक भूमिका भक्तगणांना समजावून सांगणे,मंत्र आणि त्यांचे सामर्थ्य त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन सर्वांना समजावून सांगणे व अंधश्रद्धा निर्मुलन करणे, त्या दृष्टीकोनातून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, तसेच ताम्हीनिसारख्या दुर्गम डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या खेडेगावातील ग्रामस्थांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे उध्येश डोळ्यापुढे ठेवून मंडळ कार्यरत आहे. थोडक्यात मंडळाचे कार्य धार्मिक, सामाजिक, शेक्षणिक, अध्यात्मिक तसेच सांस्कृतिक स्वरूपाचे आहे. चां. का. प्रभू समाजातील अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी असलेल्या श्री विध्यवासिनी (विंझाई) देवीचे एक भव्य दिव्य मंदिर ताम्हिणी या गावी श्री विंझाई देवस्थान मंडळ, (ताम्हिणी) या Regd. संस्थेने इ.स.२००० साली बांधून पूर्ण केले. सदर मंदिराची लांबी ६०' रुंदी ४०' तर उंची ४५' आहे. मंदिर बांधण्यास १० वर्षाचा कालावधी लागला. मंदिराला ५ कळस तसेच मंदिराच्या आतील भिंती, गाभारा संगमरवरी दगडाचा आहे. मंदिरात एका वेळेस ५०० भक्त सहज उभे राहू शकतात. असे हे भव्य मंदिर ताम्हिणी या गावी झाल्याने या गावाची ओळख केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देश विदेशातील लोकांना झाली. ताम्हिणी हे गाव पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. ते पुण्यापासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. ताम्हिणी घाटात, ताम्हणाचे आकारात खोलगट भागात श्रींचे छोटे मंदिर व परिसर असून सभोवती सह्याद्रीचा परिसर आहे. देवीचे मंदिर व त्याचा निसर्गदत्त ताम्हणाचे आकारसमान असल्यामुळे या गावास ताम्हिणी असे नाव पडले असावे असा समज आहे.
मंदिराचा इतिहास:-
शेकडो वर्षापूर्वी न्यातीतील श्री महादेव प्रभू व श्री राम प्रभू हे बंधू विंध्याचल पर्वतावर तप करीत असतांना जेष्ठ बंधू महादेव प्रभू यांनी देविचरणी आपले शिरकमल वाहून देहत्याग केला. कनिष्ठ बंधू श्री राम प्रभू त्याच विचारात घरी परत न जाता तप करीत असता देवी त्यांना प्रसन्न झाली व म्हणाली, "तू दक्षिणेकडे तुझ्या घराकडे चल,मी तुझ्यापाठोपाठ तुझ्या घरी येते. उजाडेपर्यंत डोळे उघडू नकोस व मागे पाहू नकोस". आज्ञेप्रमाणे रामप्रभू डोळे मिटून मार्गक्रमण करीत घराकडे निघाले.पहाटेच्या वेळी गार वाऱ्याची झुळूक आली असता उजाडले असे वाटून रामप्र्भुनी डोळे उघडून देवी खरोखर आपल्या मागे येत आहे का म्हणून मागे वळून पाहिले असता अग्नीचा मोठा लोळ येत असतांना दिसला व तो अदृश्य झाला व आकाशवाणी ऐकु आली, "तू घाई केलीस मी आता पुढे येणार नाही" व तो अग्नीचा लोळ जेथे अंतर्धान पावला, तेथे एक मोठी शिळा उत्पन्न झाली,हि जागा म्हणजेच हे स्थान आधरवाडी गावी घनदाट जंगलात आहे. अत्यंत शांत व रमणीय असे हे स्थान पाहून मनाला समाधान लाभते.
हे स्थान डोंगराच्या पायथ्यापाशी व दुर्गम ठिकाणी असल्यामुळे त्या काळी तेथे जावून देवीचे दर्शन घेणे फार
कठीण काम होते. या गोष्टीचा विचार करून राम प्रभूनी श्रीं च्या मूर्तीची स्थापना जवळच असलेल्या ताम्हिणी
या गावी केली. त्या वेळी त्यांनी प्रथम तेथे केंबलाचे छप्पर असलेले छोटे देऊळ बांधले, पुढे काही भक्त चैत्र
पौर्णिमेस आवर्जून ताम्हीणीस जाऊ लागले. हळूहळू ह्या देवीच्या स्थानाची माहिती लोकांपर्यंत पोहचू लागली.
शंभर सव्वाशे वर्षापूर्वी, देवळाच्या भिंती, खालचे जोते,केंबलाचे छप्पर आदी बांधकाम बडोदेकर श्री. रामराव
बळवंत हर्नेकर यांनी केले. तसा उल्लेख असलेली एक शिला जुन्या मंदिराच्या जोत्यात आढलेली आहे.श्री रघुनाथ
माधवराव देशमुख यांनी सांप्रतची देवीची मूर्ती पुण्याहून कारागीर आणून ताम्हिणीच्या डोंगरातच काळ्या
पत्थराची घडवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्री जोशी गुरुजी यांचे पौरोहित्याखाली २२ डिसेंबर १९४२
साली झाली.
श्री विंझाई देवी अनेक कायस्थ कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. त्यांत मुख्यतः विळेकर,देशमुख, प्रधान,ताम्हणे,
सबनीस,देशपांडे आदी कुटुंबांचा समावेश आहे. आपली हि विंझाई देवी कुलस्वामिनी असून अनेक कुटुंबांना तिच्या
स्थानाबद्दल माहिती नव्ह्ती. देऊळ कुठे आहे, तेथे कसे जायचे याची कल्पना नव्ह्ती.पूर्वी मुळशी ते ताम्हिणी
हा रस्ता बैलगाडीचा व डोंगरातील झाडीतून होता. मुळशी ते दावडी हा प्रवास टाटा कंपनीच्या लौंच मधून नदीतून
करावा लागे. दावडी ते ताम्हिणी हे ५ किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागे. सर्व शिधा सामुग्री पुण्याहून
बरोबर न्यावी लागे. त्यामुळे सुरवातीस फारच कमी कुटुंबे चैत्र पौर्णिमेच्या उत्सवास जात असत.
श्री विंझाई देवस्थान मंडळाची प्रगती:-
ताम्हिणी येथे १८ एप्रिल १९७३ रोजी,चैत्र पौर्णिमेस जमलेल्या भक्त मंडळींच्या उपस्थितीत श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी या संस्थेची स्थापना झाली. निधी जमा करून गाभारा बांधून पूर्ण झाल्यावर माघ वद्य अष्टमीस-४ मार्च १९७५ साली पुण्याचे वेदाचार्य श्री फाटक गुरुजी व श्री रामभाऊ उपाध्ये गुरुजी यांच्या पौरहित्याखाली नवीन गाभाऱ्यात श्री विंझाई मातेची पुनरप्राणप्रतिष्ठा श्री वसंतराव आ. प्रधान व सौ. लीला प्रधान यांचे हस्ते झाली. मंडळाच्या प्रयत्नाने वाहतुकीयोग्य रस्ता झाला, एस. टी. ची सोय करून दिल्याने दर उत्सवास भक्तांची संख्या वाढू लागली. आजमितीस सुमारे १००० ते १२०० भक्त चैत्र पौर्णिमेच्या उत्सवास येतात.
मंडळाची स्थापना झाल्यानंतर पहिली सभा दादर येथे दि.२६.०१.१९७६ रोजी झाली. त्या सभेत मंडळाची घटना स्वीकारण्यात आली.
देवीचे नवीन मंदिर
मंडळ स्थापन झाल्यानंतर जुन्या मंदिराचा जीर्णोधार करण्याचे ठरून नवीन मंदिर बांधण्याचे ठरले. सर्व भक्त व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने निधी गोळा करून प्रत्यक्ष बांधकामास डिसेंबर १९९० मध्ये सुरवात झाली.२००० साली श्रींचे नवीन मंदिर तयार झाले. काशीपीठाचे प्रमुख श्री. चंद्रशेखर शिवाचार्य शंकराचार्य यांचे उपस्थितीत कलशारोपण झाले.
भव्य गाभारा
मंदिर अत्यंत भव्य दिव्य असून आंतून संपूर्ण संगमरवर लावलेला आहे. हे देवीचे जागृत स्थान असल्याने मंदिरात येताच भक्तांस समाधान प्राप्त होते. पुण्याहून कोकणात जाणारा रस्ता हा ताम्हिणी गावाजवळून जात असल्याने अनेक भक्त देवीचे दर्शन घेऊनच पुढील मार्गक्रमण करतात. इतके सुंदर मंदिर पाहून आनंदित होतात. मंदिराच्या परिसरात श्री कालिकादेवी श्री खंडोबा व श्री भैरवाचे स्थान तसेच मारुतीचे मंदिर आहे.
हे मंदिर म्हणजे शक्तीपीठ आहे व त्याचे पूर्ण पीठांत रुपांतर होण्यासाठी येथे शिवमंदिराची उभारणी होणे आवश्यक आहे असे श्री शंकराचार्यांनी सांगितल्याने मंडळ तेथे शिवमंदिर उभारण्याच्या प्रयत्नांत आहे. सर्व भक्तांना व न्यातीबंधावना विनंती आहे कि आपण सढळ हस्ते मंडळास आर्थिक सहकार्य करावे. म्हणजे शिवमंदिराचा तसेच भक्तनिवास विस्तार व मंदिर परिसर सुशोभित करण्यचा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. ह्या मंदिरास आपण भेट देऊन देवीच्या कृपाशीवार्दाचा लाभ घ्यावा अशी मंडळातर्फे सर्वाना नम्र विनंती.
देवळांतील मूर्ती :-
गाभार्यात अडीच फूट उंचीची, चतुर्भुजा महीषासूरमर्दिनीची शिलामूर्ती आहे. उजव्या हातात खड्ग, डाव्या हातात ढाल,पुढच्या उजव्या हातात महिषासुराच्या पाठीत खुपसलेला त्रिशूल व डाव्या हातात महिषासुराचे दाबलेले तोंड. देवीचा उजवा पाय महिषासुराच्या पाठीवर व दावा पाय जमिनीवर घट्ट रोवलेला तसेच पदर कासलेला, मस्तकावर मुकुट, मोकळे सोडलेले केस व कपाळावर मालवत अशी प्रसन्न मूर्ती आहे. देवीच्या डाव्या बाजूस श्रीमहालक्ष्मी व महासरस्वती,उजव्या बाजूस वाघजाई व शिरकाई देवीच्या सुंदर मूर्ती बसविलेल्या आहेत. ह्या मूर्तींची स्थापना नवीन मंदिर व नवीन गाभारा झाल्यावर ६ एप्रिल २००१ रोजी केली.
कुलाचार:
श्री विंझाईचे भक्त सर्वसाधारणपणे
१)चैत्र पौर्णिमा
२)श्रावण पौर्णिमा
३) अश्विन शुक्ल प्रतिपदे पासून विजयाद्श्मी पर्यंत दहा दिवस
४)मार्गशीर्षातील चंपाषष्ठी
५) माघ पौर्णिमा
६) पौष पौर्णिमा
७) फाल्गुन पौर्णिमा
या दिवशी कुलधर्म करतात. या निमिताने देवीची पूजा, अर्चना, महानैवेद्य, तळई व आरती असा क्रम पाळला जातो. अश्विन महिन्यात नवरात्रात अखंड दीप,घटस्थापना, पुष्पमाला, सुवासिनी किंवा कुमारिका भोजन तसेच एक दिवस सुवासिनी -पूजन करण्याचा प्रघात आहे. प्रतिमासी अष्टमी हा दिवस देवीच्या उपासनेचा पवित्र दिवस मानला जातो. त्याशिवाय मंगळवार व शुक्रवार हे दोन वार देवीच्या पूजा-अर्चनाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात.
श्रींनवरात्रौत्सव:दि.२८.०९.२०११ रोजी ताम्हिणी येथे उत्सवाची सुरवात अत्यंत आनंदाने आणि भाविकतेने झाली. श्री विंझाईमाता आणि परिवार देव-देवतांवर षोडोपचारे पूजाविधी संपन्न झाला. या पूजेचे यजमानपद श्री. सुधीर व. ताम्हणे व सौ. स्वप्ना सुधीर ताम्हणे यांस लाभले. श्री. जोशी गुरुजींनी या पूजेचे पौराहित्य केले. नंतर ताम्हिणी निवासीयांच्या तर्फे घटाची स्थापना करण्यात आली. आलेल्या भक्ताच्या साथीने आरती झाली. या वर्षी प्रथमच गावात वीज नसताना मंदिर आणि आजूबाजूचा परिसर दिव्यांनी उजळून निघाला. कै. चंद्रकांत रामचंद्र ताम्हणे (नेहरूनगर, कुर्ला ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचा नातू रोहन अजित ताम्हणे यांचकडून जनरेटर सेट अर्पण करण्यात आला.