दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व संपादन करणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणार्या डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा २९ एप्रिल १८६७ हा जन्मदिन. भारताचे एडिसन म्हणून ओळखल्या जाणार्या या महान शास्त्रज्ञाचा जन्म मुंबईमध्ये एका मॅजिस्ट्रेटच्या घरात झाला. 'आयुष्यात भाकरीची भ्रांत सुटायची असेल तर त्यासाठी सरकारी नोकरी हा एक चांगला पर्याय आहे,' असा विचार असलेल्या कुटुंबात जन्माला आलेला हा शंकर पुढे महान शास्त्रज्ञ होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण शाळेत असताना एकदा त्यांच्या वाचनात युरोपीयन शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांबद्दल केलेलं विधान आलं. त्यात युरोपीय शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांवर ताशेरे ओढले होते. ''संशोधन करून एखादं नवं यंत्र तयार करण्याचं तंत्र भारतीय शास्त्रज्ञांकडे नाही. फार तर ते यंत्र चालवू शकतील, फारच झालं तर त्या यंत्राची नक्कल करतील. यापलीकडे भारतीय शास्त्रज्ञांची झेप नाही.'' असा उल्लेख त्यात होता. भारतीय शास्त्रज्ञांबद्दल युरोपीय शास्त्रज्ञांनी केलेलं बेलगाम विधान ऐकून धुळ्याच्या शाळेत शिकत असलेल्या त्या चिमुरडय़ा मुलाने युरोपीयांचं हे विधान त्यांच्याच धरतीवर जाऊन त्यांनाच पुसायला लावीन, असा निर्धार केला. लहानपणी एकदा भिसे साखर आणायला वाण्याकडे गेले. त्यावेळी वाण्याने लबाडी करून कमी वजनाची साखर दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याबाबत त्यांनी व्यापाऱ्याला विचारलं असता, ''माझ्या काटय़ावर विश्वास नसेल तर आपोआप वजन करणारं यंत्र शोधून काढ.'' असं त्या वाण्याने त्यांना खोचकपणे म्हटलं. त्यावेळी 'एक दिवस तुला असे यंत्र देईन,' असं ठामपणे छोटे शंकरराव त्याला म्हणाले. त्यावेळी आपल्या मुलाची यंत्रांची ही आवड पाहून वडिलांना आनंद वाटला होता. पण सरकारी नोकरीच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांनी शंकररावांनाही ३० रुपये महिना पगारावर कारकुनाच्या नोकरीवर ठेवलं. याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७ मध्ये 'इन्व्हेन्टर रिव्ह्यू अँड सायंटिफिक रेकॉर्ड' या मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाईकाला हवं तेवढं वजन करून देणारं यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. तयार केलेले हे यंत्र त्यांनी त्या वाण्याला आवर्जून दाखवले. यानंतर १९०० मध्ये भिसे यांचं लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्रसामग्रीकडे लागलं. त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो इत्यादी यंत्रांच्या रचना आणि कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी 'भिसोटाइप' या यंत्राचा शोध लावला व त्याचं प्रथम इंग्लंडमध्ये आणि नंतर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये एकस्व (पेटंट) घेतले. या यंत्राच्या उत्पादनासाठी सर रतनजी टाटा यांचे सहकार्य मिळवून 'द टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट' ही कंपनी लंडन येथे १९१० मध्ये स्थापन केली; पण १९१५ मध्ये ती बंद पडली. त्याच सुमारास दर मिनिटाला साधारण बाराशे अक्षरं छापणारं 'गुणित मातृका' हे यंत्र तयार केलं आणि १९१६ मध्ये ते विक्रीला आणलं. १९१६ साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी 'युनिव्हर्सल टाइप मशीन' या कंपनीच्या विनंतीनुसार 'आयडियल टाइप कास्टर' हे यंत्र शोधून काढले आणि अमेरिकेत त्याचं एकस्व घेतलं. या यंत्राच्या उत्पादनासाठी त्यांनी 'भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन' ही कंपनी स्थापन करून १९२१ मध्ये पहिलं यंत्र विक्रीला आणलं. याशिवाय मुद्रण व्यवसायातली आणखी अशी अनेक यंत्रे त्यांनी तयार केली. १९१०मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातलं एक भारतीय औषध फार गुणकारी ठरलं. या औषधाचं रासायनिक पृथ:करण त्यांनी करवून घेतलं आणि त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे, हे जाणलं. १९१४ साली भिसेंनी स्वतच एक नवीन औषध तयार करून त्याला 'बेसलीन' हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरलं. पहिल्या महायुद्धात या औषधाचा अमेरिकन लष्कराने मोठय़ा प्रमाणावर वापर केला. या औषधावर आणखी संशोधन करून आयोडीन घटक असलेलं, पण पोटात घेता येईल असं एक औषध त्यानंतर भिसेंनी तयार केलं आणि त्याच्या उत्पादनासाठी १९२३ मध्ये न्यूयॉर्क इथे कंपनी स्थापन केली. १९२७ मध्ये या औषधाचं उत्पादन आणि वितरणाचे हक्क त्यांनी शेफलीन कंपनीला विकले. या औषधास त्यांनी 'आटोमिडीन' (आण्विय आयोडीन) हे नाव दिलं. हे औषध बऱ्याच रोगांवर उपयुक्त ठरलं. १९१७ साली त्यांनी कपडे धुण्यासाठी वापरता येईल असं एक संयुग तयार केलं. त्याला 'शेला' हे नाव देऊन त्याच्या निर्मितीचे हक्क एका इंग्लिश कंपनीला विकले. भिसे यांनी विद्युत शास्त्रातही बरंच प्रयोगात्मक संशोधन केलं. त्यांनी तयार केलेल्या 'स्वयंचलित आगामी स्थानदर्शक' यंत्रामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आपोआप कळणार होतं. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरायला नकार दिला. सध्या चच्रेत असलेल्या सौरऊर्जेवर चालू शकतील अशा मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांचीच! समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातले विविध वायू वेगळे करणारं यंत्र, जाहिराती दाखविणारं यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण आणि नोंदणी करणारं यंत्र, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्रे पाठविणारं यंत्र अशा अनेक यंत्रांचे शोध त्यांनी लावले. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने त्यांना डी. एस. सी. ही पदवी दिली. २९ एप्रिल १९२७ रोजी- भिसे यांच्या ६० व्या वाढदिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत 'अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ' म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. खरं तर १९०८ सालीच युरोपीय व अमेरिकन नियतकालिकांनी भिसे यांना 'इंडियन एडिसन' हे बिरुद बहाल केलं होतं. शिकागो विद्यापीठाने त्यांना सायको-अॅनालिसिसमधील डॉक्टरेट बहाल केली, तर माऊंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व दिले. मुद्रणशास्त्रातील भिसे यांच्या संशोधनाचा अंतर्भाव अमेरिकन पाठय़पुस्तकांत झाला. १९०० साली मद्रास येथे भरलेल्या इंडियन इंडस्ट्रियल काँग्रसचे ते अध्यक्ष होते. अमेरिकेतल्या जागतिक दर्जाच्या 'हुज हू' या संदर्भग्रंथात समावेश झालेले भिसे हे पहिलेच भारतीय. 'भारताचे एडिसन' असे म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. त्यावेळी २३ डिसेंबर १९३० रोजी भिसे यांनी आपले आदर्श असलेल्या थॉमस अल्वा एडिसन यांची त्यांच्या प्रयोगशाळेत भेट घेतली.